पुणे – प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराडी येथे घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
जान्हवी पाठक (वय २३) असे या तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली. याप्रकरणी तरुणीच्या उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय काकांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय २३, मूळ रा. पहाडगंज, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खराडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेजण शालेय शिक्षणापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ती खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती. तर आरोपी नोईडा येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. जान्हवी गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात राहत होती. आरोपी दोन दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी नोईडा येथून पुण्यात आला होता.
गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली उतरला. त्याच वेळी जान्हवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
