ब्रेकिंग न्यूज

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सदनिकाधारकांनी महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी घ्यावी

Share

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे. सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी १ ऑक्टोबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केले आहे.

एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक गिरीजा शंकर, वाणिज्यिक संचालक मेजर शंकर करजगी आणि संचालक बागेश्री मंठाळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आखाती युद्धानंतर एलपीजीचा पुरवठा विस्कळित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाबाबतच्या आदेशांसह अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत एलपीजी नियंत्रण आदेश अधिसूचित केला आहे. त्यानुसार पीएनजीची सुविधा उपलब्ध असलेल्या घरांनी त्याचा वापर करणे अपेक्षित आहे.

एमएनजीएलच्या माहितीनुसार, पुणे परिसरात सुमारे नऊ लाख घरांपर्यंत पीएनजीचे जाळे पोहोचले असून, पाच लाख घरांमध्ये त्याचा वापर सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरातील सुमारे साडेसहा हजार सोसायट्यांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, जवळपास चार लाख सदनिकांनी अद्याप जोडणी कार्यान्वित केलेली नाही. यातील काही सदनिका बंद आहेत, काही भाडेतत्त्वावर आहेत, तर काही ठिकाणी एलपीजीचा वापर सुरू आहे.