सोलापूर – समस्त महिलांचा आवडता वस्त्र अलंकार म्हणजे पैठणी. सणसमारंभासाठी पैठणी परिधान करण्याची क्रेझ महिला वर्गात पाहायला मिळते. पण अस्सल पैठणीच्या नावाने डुप्लिकेट पैठणी ग्राहकांच्या गळ्यात मारली जाते. आता ग्राहकांना ओरिजिनल पैठणी त्वरित ओळखता येणार आहे.
ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी यासाठी आता पैठणीवर एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू आहे. त्यामुळे, पैठणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होणार नाही, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
बारकोड स्कॅन केल्यानंतर पैठणी कोठे तयार झाली? कोणत्या कारागीराने बनवली? किती दिवस लागले? याची सर्व माहिती ग्राहकांना मिळेल.
पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले असताना संजय सावकारे पत्रकारांशी बोलत होते. पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे, तो एक कलेचा भाग आहे, एक पैठणी तयार करायला 20 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो, त्यामधून सुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी मिळत असल्याचे सावकारे यांनी सांगितले.
