डोळ्यावर स्प्रे मारला, नजर धूसर होताच ३० लाख पळवले ; गुलटेकडी मार्केटयार्ड जवळील घटना

डोळ्यावर स्प्रे मारला, नजर धूसर होताच ३० लाख पळवले ; गुलटेकडी मार्केटयार्ड जवळील घटना
Share

पुणे – दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या डोळ्यात स्प्रे मारून ३० लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मार्केटयार्ड रस्त्यावर पूजा मेडिकलसमोर भरदिवसा घडली.

या प्रकरणी श्रवण शंकरलालजी देवासी (वय २२, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २८) पाच अनोळखी तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रवण देवासी आणि त्यांचे सहकारी गणपत देवासी हे दोघे दुपारी सव्वाएकच्या सुमारास दुचाकीवरून व्यवसायाची ३० लाख रुपयांची रोकड बॅगमध्ये घेऊन जात होते. शिवनेरी रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र आणि पूजा मेडिकलसमोर पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांची दुचाकी फिर्यादींच्या वाहनाला आडवी लावली.

आरोपींनी दोघांच्याही चेहऱ्यावर स्प्रे मारला त्यामुळे त्यांची नजर धूसर होताच दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फिर्यादींच्या वाहनावरील रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर पाचही दरोडेखोर सिटी प्राईड चौकातून कात्रजच्या दिशेने पसार झाले. आरोपी सुमारे १८ ते २१ वर्ष वयोगटातील आहेत. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बसवराज माळी करत आहेत.

Vedh News