पुण्यात मद्यप्राशन करून महिला पोलिसाने विरुद्ध दिशेने दामटले वाहन ; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पुण्यात मद्यप्राशन करून महिला पोलिसाने विरुद्ध दिशेने दामटले वाहन ; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Share

पुणे- मद्यप्राशन करून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात मांजरी परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ३९ वर्षीय महिला कर्मचारी काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत होती. मांजरी परिसरात वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवत जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या प्रकाराचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या व्हिडिओमध्ये संबंधित महिला कर्मचारी गणवेशात दिसत असून मद्यप्राशन केले आहे का अशी विचारणा केली असता तिने मान्य केल्याचे ऐकू येते. घटना घडली तेव्हा त्या रजेवर होत्या अशीही माहिती समोर आली असून रजेवर असताना त्यांनी पोलीस गणवेश कसा परिधान केला असाही प्रश्न विचारला जात आहे.
संबंधित वाहनाला नंबरप्लेट नसल्याचाही आरोप करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली.

संबंधित महिला कर्मचारी रविवार आणि सोमवार दोन दिवस रजेवर होती. घटनेपूर्वी बंडगार्डन परिसरात मैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती का, नेमके तिने मद्यप्राशन केले होते का, केले असेल तर कुठे मद्यप्राशन केले, व्हिडिओमधील दृश्ये, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्याच्या आधारे पोलीस तपास सुरु आहे.

 

Vedh News