‘आत्म शुद्धीकरणासाठी तुमची अंगठी द्या’ असे सांगत भामट्याने पळवली ज्येष्ठ नागरिकाची अंगठी

पुणे – विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन घरी जाणार्या ज्येष्ठ नागरिकाला भामट्याने बोलता बोलता फसवले. मला आत्मिक शुद्धीकरण करायचे आहे, असे सांगून या भामट्याने ज्येष्ठ नागरिकांची अंगठी पिशवीत टाकायला सांगून हातचलाखी करुन ती अंगठी पळवली.
याबाबत धनकवडी येथील एका ६७ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना धनकवडी येथील विठ्ठल मंदिराजवळ २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दररोज धनकवडी येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ते मंदिरात जाऊन पाया पडून घरी परत येत असताना वाटेत एका इसमाने त्यांना धक्का मारुन मला ओळखले का, असे विचारले. त्यावर ज्येष्ठ नागरिकाने नकार देताच त्या भामट्याने ‘‘माझे तुमच्याकडे काम आहे. माझ्या घरी सुतक आहे. मला आत्मिक शुद्धीकरण करायचे आहे व मला मंदिराला ५ हजार रुपये देणगी द्यायची आहे. मला तात्पुरती तुमची हातातील सोन्याची अंगठी द्या, मला आत्मशुद्धीकरण करण्यासाठी पाहिजे,’’ असे बोलून त्याने आपल्या जवळील पिशवीत ५ हजार रुपये मोजून टाकले. आणि या पिशवीत तुमची अंगठी टाका मी, तुम्हाला परत देतो, असे सांगितले.
त्यावर फिर्यादी यांनी अंगठी काढून त्याच्या पिशवीत टाकली. त्याने ती पिशवी फिर्यादी यांच्या हातात दिली व पिशवी मंदिरात गेल्यावर उघडा, असे सांगितले. त्यांना शंका आल्याने त्यांनी पिशवी बघितली असता त्यात दगड आढळून आला. दरम्यान तो भामटा आपल्या साथीदारासोबत दुचाकीवर बसून वेगात गुलाबनगरच्या दिशेने निघून गेला. पोलीस हवालदार तडवी तपास करीत आहेत.






