पिंपरी चिंचवड महापालिकेचा मुख्य अभियंता एसीबीच्या जाळ्यात ; कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी मागितली १९ हजारांची लाच

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेत आज, गुरुवारी एसीबीने छापा टाकून महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी तब्बल १९ हजार रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागात एका कामाचा ठेका मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. हे काम मंजूर करून देण्यासाठी व ठेक्याची प्रक्रिया सुकर करण्यासाठी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे (वय ५७, रा. निगडी प्राधिकरण ) यांनी तक्रारदाराकडे १९ हजार रुपयांची लाच मागितली होती.
एसीबी ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तक्रार करणाऱ्या ठेकेदाराने सुमारे ९१ लाख ५७ हजार रुपयांची पाच टेंडर घेतली होती. या टेंडरच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी टेंडर रकमेच्या अर्धा टक्का दराने ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीच्या पडताळणीत ३८ लाख रुपयांच्या तीन टेंडर फाइल्सवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी एसीबी ने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात छापा टाकत, प्रमोद ओंभासे यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान या प्रकरणी पिंपरीतील संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या धडक कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.






