नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या जीवाला धोका? केली पोलीस संरक्षणाची मागणी ; काय आहे प्रकरण?

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या जीवाला धोका? केली पोलीस संरक्षणाची मागणी ; काय आहे प्रकरण? 
Share

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मशीन खरेदी निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी केला आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

संदीप वाघेरे यांनी या प्रकरणी पुष्पराज शेषाद्री गोवर्धन आणि त्यांचे पुत्र ययाती गोवर्धन यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या तक्रारीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयासाठी मशीन खरेदी करण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदेमध्ये प्रत्यक्ष किंमतीच्या तुलनेत जाणीवपूर्वक वाढीव रक्कम दाखविण्यात आल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही संबंधित कागदपत्रांसह तक्रार केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत आले.

महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यामुळे आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वाघेरे यांनी केला आहे. वाघेरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निविदा प्रकरणाबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित कंपनीचे मालक पुष्पराज शेषाद्री गोवर्धन यांनी त्यांच्या कार्यालयात येऊन भेट घेतली. या प्रकरणात लक्ष घालू नये आणि प्रकरण अधिक वाढवू नये, असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, काळेवाडी परिसरातील काही गुंडांकडून आपला बंदोबस्त करण्याची चर्चा झाल्याची माहिती मिळाल्याचे वाघेरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुष्पराज गोवर्धन आणि त्यांचे पुत्र ययाती गोवर्धन यांनी स्थानिक गुंडांना हाताशी धरून आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. आपल्याला यापूर्वीही धमक्या मिळाल्याबाबत वारंवार तक्रारी केल्या असून, त्यावर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप संदीप वाघेरे यांनी केला आहे. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष झाल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाडस वाढू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित व्यक्तींविरुद्ध धमकी, कथित कटकारस्थान आणि जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, कायद्यानुसार योग्य ती फौजदारी कारवाई करावी आणि आपल्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

या तक्रारीची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दखल घेतली जाते का, संबंधित आरोपांची चौकशी कशी होते आणि नगरसेवक वाघेरे यांना पोलीस संरक्षण मिळते का, याकडे शहरातील नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vedh News