ब्रेकिंग न्यूज

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ, या तारखेपर्यंत भरता येणार एन्युमरेशन फॉर्म

Share

पुणे- मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेली संधी आता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून द्यावा अशी अनेक पक्षांनी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 दिवसाचा कालावधी वाढवून दिला आहे.

निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील प्रारूप (ड्राफ्ट) मतदार याद्या आता पूर्वीच्या ५ ऑगस्टऐवजी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. या दाव्यांचे आणि हरकतींचे निवारण १५ ऑक्टोबरपर्यंत केले जाईल, तर अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

एन्युमरेशन फॉर्म म्हणजे काय ?

ही मतदार यादीची तपासणी आहे. तुमचे नाव, पत्ता आणि इतर माहिती बरोबर आहे का हे तपासण्यासाठी हा फॉर्म भरायचा असतो. यामुळे चुकीची नावे कमी होतात आणि नवीन पात्र मतदारांची नावे यादीत येतात.

फॉर्म कसा भराल ?

1. ऑनलाइन : voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घरी बसून फॉर्म भरू शकता.

2. ऑफलाइन : तुमच्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्याकडे जाऊन फॉर्म भरून देऊ शकता.

फॉर्म भरताना काही अडचण आल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास थेट आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा.

फॉर्म नाही भरल्यास काय होईल ?

ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 8 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही एन्युमरेशन फॉर्म भरला नाही, तर तुमचे नाव येणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती केली आहे की, आपल्या मताचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी व्हा आणि वेळेत फॉर्म सादर करा.