बारामतीतील लॉजवर वेश्या व्यवसाय ; मालकासह तिघांवर गुन्हा

बारामती – येथील भिगवण रोडवरील सावळ गावच्या हद्दीत असलेल्या शिवन्या लॉजवर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. २३) संध्याकाळी बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली.
हॉटेल मॅनेजर आदित्य पांडुरंग पवार (वय २२), साफसफाई कर्मचारी महंमद नजीर शेख (वय ५४) आणि लॉजमालक निलेश मच्छिंद्र शिंदे (रा. वंजारवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोगस ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला. यावेळी हॉटेल मॅनेजर, साफसफाई कर्मचारी आणि लॉजमालक हे तिघेजण महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करीत असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक राजीव शिंदे यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक नारायण पवार तपास करीत आहेत.






