गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार !

पिंपरी- पाणीपुरवठा व्यवस्थेतील देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या अंतर्गत निगडी जलशुद्धीकरण केंद्रावर आणि सेक्टर क्र. २३ मध्ये नागरी व विद्युत दुरुस्तीचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर देखील पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता असून पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.







