फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करणाऱ्या आठ जणांवर पुणे महापालिकेकडून गुन्हा दाखल

पुणे – विमाननगर, विमानतळ रस्ता, सिम्बायोसिस महाविद्यालय आणि म्हाडा कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणे, झाडे, भिंती तसेच महापालिकेच्या विद्युत खांबांवर अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर व बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. पुणे महापालिकेच्या परवाना निरीक्षक मनोज बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, नगर रोड वाघोली क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाश चिन्ह विभागाकडून परिसरात पाहणी केली जात होती. त्यावेळी ‘जाहिरात नियंत्रण नियमावली २०२२’ नुसार परवानगी न घेता विविध पीजी, को-लिव्हिंग आणि प्लॉट विक्रीच्या जाहिरातींचे बोर्ड, पोस्टर व बॅनर लावल्याचे आढळून आले.
महापालिकेच्या पथकाने हे अनधिकृत फलके काढून टाकली. त्यानंतर युथविले को-लिव्हिंग, निर्माण डेव्हलपर्स, मंगलमूर्ती वास्तु प्रा. लि., के. बी. लक्झरी पीजी, धरणी पीजी, श्रीराम पीजी, श्री बालाजी पीजी आणि एका रेंटल जाहिरातदाराविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम १९९५ चे कलम ३ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २४४ व २४५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.






