पुण्यात महिलेशी गैरवर्तन आणि पतीला मारहाण केल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

पुण्यात महिलेशी गैरवर्तन आणि पतीला मारहाण केल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ! 
Share

पुणे – मॉडेल कॉलनी परिसरात एका महिला रहिवाशासोबत गैरवर्तन केल्याचा आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी अभय परमार यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रविवार (दि.२२) संध्याकाळी वॉचमनने पीडित पत्नीच्या पतीला चारचाकी गाडी धुण्यासाठी इमारतीच्या मागे आणण्यास सांगितले होते. पती गाडी घेऊन तिथे आल्यानंतर परमार यांनी वाद घालत मारहाण केल्याचा (डोळ्याला दुखापत केल्याचा) आणि महिलेशी गैरवर्तन व विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये नमूद आहे.

विशेष म्हणजे अभय परमार यांची पोलीस खात्यामधील कारकीर्द देखील वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल २०१८ मध्ये ते अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्याच काळात केडगाव येथे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. त्या गंभीर घटनेनंतर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कथित त्रुटी राहिल्याचा ठपका ठेवत अभय परमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ते पुन्हा सेवेत रुजू होऊन निवृत्त झाले होते.

आता मॉडेल कॉलनीमध्ये झालेल्या प्रकारामुळे परमार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. केवळ याच घटनेपुरता हा विषय मर्यादित नसून, स्थानिकांना त्रास देणे, त्यांना धमकावणे आणि आक्रमक पद्धतीने वागणे अशा अभय परमार यांच्या कथित वर्तनाबद्दल परिसरातील काही नागरिकांनी आपली अस्वस्थता बोलून दाखवली आहे. यासोबतच तक्रारदार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ते संरक्षण मिळावे, तसेच तपासादरम्यान त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

Vedh News