पुणे – गणेशोत्सवातील देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे शहर वाहतूक शाखेने महत्त्वाचे वाहतूक बदल जाहीर केले आहेत. १८ सप्टेंबरपासून काही प्रमुख रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत.
१८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडसह मध्यवर्ती भागातील अनेक रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान साजरा होत आहे. शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी पुण्यासह शहराबाहेरील भाविक मोठ्या संख्येने मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून कोंडी होण्याची शक्यता असल्याने हे बदल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
