पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी पती आणि सासू सासरे यांना पोलीस कोठडी

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी पती आणि सासू सासरे यांना पोलीस कोठडी
Share

पुणे – मुकुंदनगर भागात राहणाऱ्या उच्चशिक्षित पायल अक्षय झांबरे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय याच्यानंतर सासू सासरे यांना देखील अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहा सकळे यांनी त्यांना ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे आणि सासरा अरविंद झांबरे अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील नणंद (अक्षता झांबरे-निमन) अद्याप फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

पायल झांबरे (वय ३५) या उच्चशिक्षित विवाहितेने १ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून सतत सोन्याची आणि मोठ्या रकमेच्या पैशांची अतिरिक्त मागणी केली जात होती. या आर्थिक व हुंड्याच्या हव्यासापोटी सासरच्या लोकांनी पायल यांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप पायलचा भाऊ हृषीकेश पवार यांनी केला आहे.

आत्महत्येपूर्वी पायल हिने फिर्यादी ह्रषीकेश पवार यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये सासूचे नाव होते. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपी सासू, सासरे, पती यांना न्यायालयात आणले असता पायलच्या माहेरकडील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले. जोरदार घोषणाबाजी करून आरोपींच्या शिक्षेची मागणी केली. पत्रकार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

पायलच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी केली. या प्रकरणात अद्याप फरार असलेल्या पायलच्या नणंदेला (अक्षता झांबरे) तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी कोर्टाबाहेर केली.

Vedh News