पुणे- नियमितपणे सकाळी जॉंगिंग करण्यासाठी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन जवळ शुक्रवारी ( दि.११ ) घडली.
वीरेंद्र द्विवेदी (वय ३८ ) असे या दुर्दैवी संगणक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
विरेंद्र द्विवेदी हे दररोज सकाळी पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉगिंगसाठी जात . शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने धावत असताना एका अत्यंत वेगात आलेल्या इनोव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, द्विवेदी हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने त्याच कारमधून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही कार ‘ब्लूरेज डेव्हलपर्स’ या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. तसेच या गाडीचा अधिकृत पत्ता ‘अबिल हाऊस’ येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघात घडला त्यावेळी कार एक १९ वर्षांचा तरुण चालवत असल्याची माहिती आहे. याबाबत परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली जात आहे. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण का सुटले, तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
