ब्रेकिंग न्यूज

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टोलमाफी, राज्य सरकारचा निर्णय

Share

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदा महाराष्ट्र शासनाकडून टोलमाफीची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई–गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ मिळण्यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे पास किंवा स्टिकर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परिवहन महामंडळांच्या बसना देखील टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.