पुणे- बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मंगेश जगताप यांच्याविरोधात एका तरुणीच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध एका तरुणीच्या तक्रारीवरून बलात्कार, फसवणूक आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
पीडित तरुणी ही सामाजिक कार्यकर्ती असून तिने दिलेल्या माहितीनुसार, मंगेश जगताप आणि त्यांचे कॉलेज जीवनापासून म्हणजेच सुमारे 14 वर्षांचे प्रेमसंबंध होते. मंगेश यांनी सन २०१२ ते २०२६ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वर्षे हे संबंध कायम ठेवले. तसेच, पीडित तरुणीची जवळपास आठ ते दहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. काही काळाने मंगेश यांनी गुपचूप दुसरे लग्न केल्याचे समोर आले. याबाबत पीडित तरुणीने विचारणा केली असता, मंगेश यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगून काही कागदपत्रे दाखवली; परंतु ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे.
27 जुलै रोजी जिल्हा परिषदेत खळबळजनक प्रकार घडला होता. जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत पीडित तरुणीने पुणे जिल्हा परिषदेत येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी सुरुवातीला पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात मंगेश जगताप याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्याचे घटनास्थळ हे माळेगाव हद्दीमध्ये असल्यामुळे हा गुन्हा माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास माळेगावचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ करत आहेत.
