ब्रेकिंग न्यूज

नीलम गोऱ्हेंच्या टीकेला सुषमा अंधारेंचं सडेतोड उत्तर; “नावात ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवं होतं”

Share

मुंबई – शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरून केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना न्यायालयावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. न्यायालयात प्रकरण सुरू असताना ‘हे होणार, ते होणार’ असे दावे करण्यापेक्षा अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करावी, असं त्यांनी म्हटलं.

“न्यायदेवतेने एक बाजू ऐकली आहे. हे मुद्दे यापूर्वीही न्यायालयासमोर मांडले गेले आहेत. मात्र ते जणू पहिल्यांदाच सुरू झाले आहेत, अशा पद्धतीने माध्यमांमध्ये कव्हरेज केलं जात आहे,” अशी टीका गोऱ्हे यांनी केली. यावेळी त्यांनी 2024 च्या निवडणूक निकालांचाही दाखला दिला. “महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे कारण नसताना समाजात गढूळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये” असं गोऱ्हे म्हणाल्या.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरूनही गोऱ्हे यांनी निशाणा साधला. “फक्त ढगाचा गडगडाट असावा, तसं उबाठामधला ‘ठ’ काढून ‘ढ’ करावा असं दिसतंय,” अशी खोचक टीका त्यांनी केली.

गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पक्ष आणि चिन्हासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना ठाकरे आडनावावर अनावश्यक टिप्पणी करण्याची गरज नव्हती, असं अंधारे यांनी म्हटलं. गोऱ्हे यांच्या वक्तव्यावरून त्यांचा बुद्ध्यांक लक्षात येतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

“नीलम गोऱ्हे यांच्या नावामध्ये ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते,” असं म्हणत अंधारेंनी गोऱ्हेंवर थेट आणि खोचक शब्दांत पलटवार केला.

न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी सुनावणीकडे आता दोन्ही गटांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.