ब्रेकिंग न्यूज

कळसूबाई शिखरावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची सुटका

Share

अकोले- कळसुबाई, हरिश्चंद्र गडावर ट्रेकसाठी गेले असताना रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या मुंबईच्या आठ पर्यटकांची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली.

याबाबतची माहिती अशी की, मुंबईतील चार पर्यटक कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी बुधवारी आले होते. सोबत कुणीही वाटाड्या किंवा माहितगार माणूस न घेता हे कळसुबाई शिखराच्या दिशेने निघाले. वाटेत हिरवागार निसर्ग, अधून मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत ते शिखरावर पोहोचले. दिवसभर त्यांनी शिखरावर भटकंती केली. मात्र वेळेचे भान न राहिल्यामुळे त्यांना शिखरावरून खाली उतरताना उशीर झाला. संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यांच्यापैकी फक्त एकाच्या अंगात रेनकोट होता. बाकीचे त्या मुसळधार पावसात भिजत डोंगर उतरू लागले.

थंडगार वारा, दाट धुके पसरलेले आणि अंधार पसरू लागल्यामुळे ते वाट चुकले. रात्रीच्या अंधारात रस्ता शोधण्याचा ते प्रयत्न करू लागले. या आठ जणांमध्ये तीन महिला पर्यटक होत्या. त्यामुळे सगळेच हवालदिल झाले होते. सुदैवाने मोबाइलची रेंज असल्यामुळे या पर्यटकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून मदतीची विनंती केली. राजूर पोलिसांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित व वनपरिमंडळ अधिकारी शंकर लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रकांत तळपाडे, वन कर्मचारी अजय गांगड, दिनकर उघडे यांचे पथक पर्यटकांचा शोध घेऊ लागले. रात्रीचे साडेसात वाजले होते. दाट अंधार, रात्रीचा काळोख, धुके आणि निसरड्या वाटा अशा परिस्थितीत पथक शिखराच्या वाटेवरून निघाले. मोबाइल जीपीएस वरून पर्यटकांचे लोकेशन मिळाले. अखेर रात्री १०.३० सुमारास पांजरे परिसरातील कळसुबाई शिखराच्या मागील पठार भागात या पर्यटकांचा शोध लागला.