ब्रेकिंग न्यूज

राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

Share

पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. छात्रों की गूंज, या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५  वाजता हा संवाद सोहळा होणार आहे.

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जोरदार तयारीला लागली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काॅंग्रेस भवन येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीस माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, संध्या सव्वालाखे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमात देशातील शिक्षण व्यवस्था, रोजगार, परीक्षा पद्धती, स्पर्धा परीक्षा युवकांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याकडे आणि आगामी राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्‍याची चिन्‍हे आहेत.