पुणे- वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, त्यातून वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालावा अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिल्या आहेत. तसेच अंमलदारांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून दंडाच्या कारवाईला तात्पुरता विराम दिला आहे. हा आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे.
वाहतूक विभागाने प्रमुख चौक, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. कार्यालयात बसण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर कर्तव्य उतरावे अशी सूचना करताना आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पोलीस आयुक्त कार्यालयातील आढावा बैठकीत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
सायंकाळी, रात्री वाहतूक कोंडी झाल्यास ती सुटेपर्यंत संबंधितांनी हद्दीतच राहून वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. विशेषतः सोमवार, शुक्रवारी शहरात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने त्या दिवशी कोणत्याही कर्मचाऱ्याला साप्ताहिक सुट्टी देऊ नये, असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
‘ब्लॅक स्पॉट’वर लक्ष
आपल्या हद्दीतील वाहतूक कोंडीचे ‘हॉटस्पॉट’ शोधून त्यामागील कारणांचा अभ्यास करावा. सिग्नलच्या वेळेचा अभ्यास, सिग्नल सिंक्रोनायझेशन, कॉर्नर पार्किंगला आळा घालणे आणि ऑटोरिक्षांना चौकात उभे राहण्यास प्रतिबंध करणे, अशा उपाययोजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे.
सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईची ठिकाणे निश्चित केली जातील. या कारवाईसाठी वरिष्ठांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. कारवाईवेळी बॉडी कॅमेऱ्याचा वापर बंधनकारक केला आहे. वाहतूक शाखेतील कारवाईची पडताळणी करण्यासाठी डमी डिकॉय पाठवून गैरप्रकार होत नसल्याची शहानिशा करण्याचे निर्देश दिले आहेत.
