पिंपरी – अवघ्या ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना आळंदी (ता. खेड) येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका १९ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या अल्पवयीन निष्पाप मुलाला फूस लावून आपल्या घरात बोलावून त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार जुलै महिन्यापासून ते ८ ऑगस्ट या दरम्यान सुरु होता. पीडित चिमुकल्याने या अत्याचाराला विरोध करत आरडाओरड केली असता आरोपीने जबरदस्तीने त्याचे तोंड दाबून पोलिसांत किंवा कोणाकडे तक्रार केल्यास थेट मारून टाकण्याची धमकी दिली.
अखेर सततच्या त्रासाला कंटाळून मुलाने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितल्यानंतर, पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी तत्काळ दिघी पोलीस ठाण्यात बुधवारी (१२ ऑगस्ट) तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय आरोपी तरुणावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
