गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तरुणाची बोटे आणि पंजा छाटला, तीन अल्पवयीन मुले ताब्यात

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तरुणाची बोटे आणि पंजा छाटला, तीन अल्पवयीन मुले ताब्यात
Share

राजगुरूनगर- गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याची तीन बोटे तुटली असून हाताला गंभीर इजा झाली आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की या तरुणाच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागल्याचे सांगितले जात आहे.

शिवम बाळासाहेब करमारे (वय २६) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिवम आणि या अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून मंगळवारी (दि.१०) दुपारी सुमारे पावणेतीनच्या सुमारास शिवम दुचाकीवरून जात असताना तिन्हेवाडी परिसरात संबंधित अल्पवयीन मुलांनी त्याला अडवले आणि धारदार कोयत्याने सपासप वार केल्याचा आरोप आहे.

हल्लेखोरांनी शिवमच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर वार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात त्याची तीन बोटे तुटली असून हाताला गंभीर इजा झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी जखमी शिवमचा चुलत भाऊ आदित्य काळुराम करमारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर राजगुरुनगर पोलिसांनी तातडीने तपास करत तिन्ही अल्पवयीन संशयितांचा राक्षेवाडी परिसरातून शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे राजगुरुनगर आणि खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Vedh News