हवालदाराकडून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, मुंबई पोलीस दलातील संतापजनक प्रकार

हवालदाराकडून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, मुंबई पोलीस दलातील संतापजनक प्रकार
Share

मुंबई- मुंबई पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका पोलीस हवालदाराविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महिला पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

आनंद नाईक असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित पोलीस हवालदाराचे नाव आहे.

पीडित महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हवालदार आनंद नाईक हा गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांवरून पीडित महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करत होता. इतकेच नव्हे तर, आरोपीने वारंवार शारीरिक सुखाची मागणी करून प्रचंड त्रास दिला. खाकी वर्दीतीलच सहकाऱ्याकडून असा सततचा त्रास सहन करावा लागल्याने अखेर पीडित महिला कॉन्स्टेबलने धैर्याने पुढे येत ताडदेव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आनंद नाईक याच्यावर ताडदेव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये विनयभंग, लैंगिक छळ आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलातीलच एका जबाबदार कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यावर अत्याचार केल्यामुळे मुंबई पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

Vedh News