चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून दुचाकीस्वारांची बसचालकाला बेदम मारहाण

पुणे- नाशिक महामार्गावरील चाकण येथे भररस्त्यात एसटी बस अडवून दुचाकीस्वारांनी बस चालकाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रवासी विनवणी करीत होते. मात्र, त्या गुंडांनी चालकाला तुडवणे सुरूच ठेवले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मात्र या मारहाणीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारी एसटी बस चाकण परिसरातून जात होती. याच दरम्यान, दोन तरुणांनी आपल्या दुचाकीने भररस्त्यात बसचा मार्ग अडवून ती थांबवण्यास भाग पाडले. गाडी थांबताच हे दोन्ही तरुण बसमध्ये घुसले आणि चालकाशी क्षुल्लक कारणावरून वाद घालू लागले. वाद वाढताच दोन्ही तरुणांनी प्रवाशांच्या देखत बसचालकाला थेट हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चालत्या बसमधील प्रवाशांसमोर घडणारा हा भयंकर प्रकार पाहून बसमधील महिला आणि नागरिक पुरते हादरून गेले.
त्यांनी हल्लेखोर तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रवाशांनी हात जोडून मारहाण न करण्याची विनंती केली. मात्र, या तरुणांनी प्रवाशांच्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत चालकाला मारहाण करणे सुरूच ठेवले. ऐन प्रवासात चालकावर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर चाकण पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी आता नागरिक व कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.






