निगडीतील मेट्रो कामादरम्यान मुख्य पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया ; ठेकेदारावर कारवाईची मागणी

पिंपरी- टिळक चौक, निगडी बसस्टॉप परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. नागरिक व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला.
मागील दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू असून, त्यालगत असलेली मुख्य पाईपलाईन कामादरम्यान फुटल्याचे सांगण्यात आले. महामेट्रोच्या ठेकेदाराने काम करताना योग्य ती खबरदारी न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या चार ते पाच घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून खोदून ठेवण्यात आला असून, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भाविक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येबाबत महानगरपालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा करून पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, सकाळी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.






