देशातील पहिल्या पाच स्वच्छ शहरांत पिंपरी-चिंचवडचा समावेश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव होणार
पिंपरी – स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराच्या निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांची आणि प्रभावी स्वच्छता व्यवस्थापनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. देशातील पहिल्या पाच स्वच्छ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला असून, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नवी मुंबई, पाचगणी, पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि विटा या शहरांनी स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या यशाबद्दल ११ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
नवी मुंबई, पाचगणी, रत्नागिरी आणि विटा या महाराष्ट्रातील अन्य शहरांचाही या यादीत समावेश झाल्याने राज्याच्या स्वच्छता क्षेत्रातील कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासकीय नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, स्वच्छता सेवकांचे अथक परिश्रम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग या सामूहिक प्रयत्नांच्या बळावर शहराने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने प्राप्त केलेल्या या पुरस्काराबद्दल महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रातील ही कामगिरी म्हणजे केवळ पुरस्कारापुरती मर्यादित उपलब्धी नसून महापालिकेचे विविध विभाग, अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील मान्यता आहे अशी भावना व्यक्त केली.
महापौर रवी लांडगे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराला राष्ट्रीय स्तरावर मिळणारा गौरव हा शहरातील नागरिक, स्वच्छता सेवक आणि महापालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे” अशी भावना व्यक्त केली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छ सर्वेक्षणातील पिंपरी चिंचवड महापालिकेची कामगिरी ही नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय लोकसहभागाची पावती आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सातत्यपूर्ण जनजागृतीवर प्रशासनाचा विशेष भर आहे”
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, “स्वच्छ सर्वेक्षणातील यश ही महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने केलेल्या नियोजनबद्ध कामाची फलश्रुती आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा गौरव भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल”
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “आरोग्य विभागाकडून विविध जनजागृतीपर आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि सफाई सेवक यांच्या योगदानासोबतच नागरिकांचे सहकार्य यामुळेच स्वच्छतेच्या या अभियानाला व्यापक यश मिळत आहे”
