चिंचवडकरांसाठी पारंपरिक अंत्यसंस्काराची सुविधा मिळावी ; विधी समितीचे सदस्य शेखर चिंचवडे यांची मागणी

चिंचवडकरांसाठी पारंपरिक अंत्यसंस्काराची सुविधा मिळावी ; विधी समितीचे सदस्य शेखर चिंचवडे यांची मागणी
Share

पिंपरी- चिंचवड गावातील नागरिकांना लाकूड व गोवऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी नगरसेवक तथा विधी समितीचे सदस्य शेखर बबनराव चिंचवडे यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रश्नासंदर्भात आमदार शंकरभाऊ जगताप आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीच्या जागेची पाहणीही करण्यात आली आहे.

चिंचवड गावातील श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदिरापासून काही अंतरावर असलेली स्मशानभूमी अनेक पिढ्यांपासून नागरिकांच्या पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी वापरली जात होती. मात्र, सन २००२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ही स्मशानभूमी हटविल्याने चिंचवड गावासह परिसरातील नागरिकांची गैरसोय झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला तब्बल २४ वर्षे उलटूनही पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झालेली नसल्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी चिंचवड-काळेवाडी पुलाजवळ चिंचवड हद्दीत विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली. ही सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरली असली, तरी विद्युत दाहिनी आणि लाकूड व गोवऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था या दोन स्वतंत्र गरजा असल्याचे शेखर चिंचवडे यांनी नमूद केले आहे.

हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराच्या परंपरा, धार्मिक भावना आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोखंडी (बिडाचे) दोन रॅक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी आमदार शंकरभाऊ जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे.

महानगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता, चिंचवडकरांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामाजिक आणि भावनिक प्रश्नाच्या दृष्टीने पाहावे. नागरिकांना त्यांच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी आवश्यक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Vedh News