पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर

पिंपरी- पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा मोठ्या संख्येने वकील सभासदांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. तब्बल तीन वर्षांनंतर सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्याने उपस्थित वकील सभासदांनी समाधान व्यक्त केले. या सभेत बार असोसिएशनच्या विकासासाठी, वकील सभासदांच्या हितासाठी आणि महिला वकिलांसह सर्व घटकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज यांच्या नावाची घोषणा सचिव ॲड. उमेश खंदारे यांच्यामार्फत करण्यात आली.
महिला वकिलांना संघटनेच्या कार्यकारिणीत अधिक प्रतिनिधित्व मिळावे, सामाजिक समावेशकता वाढावी आणि बार असोसिएशनची कार्यपद्धती अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिला वकील सभासदांसाठी ३० टक्के आरक्षण, तसेच कार्यकारिणीमध्ये अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), इतर मागासवर्ग (OBC) आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील प्रत्येकी किमान एका सभासदाला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. बार असोसिएशनच्या नियमावलीत व घटनेत (Rule Book/Constitution) आवश्यक दुरुस्त्या करण्यास आणि नवे बोधचिन्ह (Logo) स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने दर तीन वर्षांनी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्षपद महिला वकिलांसाठी राखीव ठेवण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच मोशी न्यायालयाच्या संदर्भात “One Court, One Bar” ही संकल्पना स्वीकारण्यात आली. सभेत झालेले सर्व ठराव माहितीसाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वकील सभासदांचे प्रश्न, संघटनेची एकजूट, पारदर्शकता आणि बार असोसिएशनच्या भविष्यातील वाटचालीसंबंधी अन्य विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
सभेला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सचिन थोपटे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. सुनील कडुस्कर, ॲड. विलास कुटे, ॲड. किरण पवार, ॲड. सुदाम साने आणि ॲड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ वकील उपस्थित होते. सभेला महिला वकिल, ज्येष्ठ वकिल यांचेसह तरुण वकिलांची विशेष उपस्थिती लाभली.
विशेष सर्वसाधारण सभेच्या यशस्वी आयोजनासाठी महिला सचिव ॲड. रिना मगदूम, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. संकेत सरोदे, ॲड. राकेश जैद, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. विकास शर्मा आणि ॲड. सीमा शर्मा यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सभेतील उत्स्फूर्त सहभागामुळे बार असोसिएशनमध्ये सामूहिक निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक नेतृत्वाला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सभेच्या शेवटी बारच्या महिला सचिव ॲड. रिना मगदूम यांनी उपस्थित सर्व वकील सभासदांचे आभार मानले.






