पुण्यात शिवाई बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे १७ प्रवाशांचा जीव वाचला

पुणे – पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट परिसरात एका धावत्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसला अचानक भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व १७ प्रवाशांचा जीव वाचला आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी शंकरशेठ रस्त्यावर अपोलो हॉस्पिटलसमोर घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस प्रवाशांना घेऊन स्वारगेटच्या दिशेने जात होती. बस अपोलो हॉस्पिटलजवळ आली असताना गाडीतून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच ज्वाला भडकू लागल्या. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच बस चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत गाडी तात्काळ रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी उभी केली.
चालकाने गाडी थांबवताच प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्वांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे बसमधील १७ प्रवाशांना वेळेत बाहेर काढता आले, ज्यामुळे एका मोठ्या दुर्घटनेतून या सर्वांचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे काही वेळ या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती, जी नंतर सुरळीत करण्यात आली.






