रिसॉर्टला वेढा देऊन पोलिसांची धाड! ; भोरच्या आमराई रिसॉर्टमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

रिसॉर्टला वेढा देऊन पोलिसांची धाड! ; भोरच्या आमराई रिसॉर्टमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Share

भोर- पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेळू येथील ‘आमराई रिसॉर्ट’वर राजगड पोलिसांनी अचानक धाड टाकून या ठिकाणी सुरु असलेल्या देह व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. अवघ्या १००० रुपयामध्ये मुलींचा सौदा केला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईने एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजगड पोलिसांनी भोर तालुक्यातील वेळू हद्दीतील ‘आमराई रिसॉर्ट’वर ही धडक कारवाई केली. गेल्या दोन महिन्यांपासून या रिसॉर्टमध्ये आरोपी रघु शेट्टी हा विविध राज्यांतील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या बातमीच्या आधारे राजगड पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला आणि रिसॉर्टवर एक डमी ग्राहक पाठवला. तिथे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची पूर्ण खात्री पटताच पोलिसांनी एकाच वेळी संपूर्ण रिसॉर्टला वेढा घालून छापा टाकला. छापेमारीदरम्यान या रिसॉर्टमध्ये अवघ्या १००० रुपयांत हा अनैतिक व्यवहार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या धडक कारवाईत मुंबई, दिल्ली, ठाणे, कर्नाटक, पश्चिम बंगालमधील तब्बल १३ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार आणि दुसरा आरोपी फरार आहे. राजगड पोलीस ठाण्यात वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या ‘आमराई रिसॉर्ट’मध्ये हा गंभीर प्रकार सुरू होता, ते रिसॉर्ट एका बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण भोर आणि पुणे तालुक्यात सुरू आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने हे रिसॉर्ट चालवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या रिसॉर्टचे मुख्य मालक नेमके कोण आहेत? आणि या रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे? या सर्व बाजूंनी राजगड पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

 

 

Vedh News