रावेत येथे दिवंगत अजित पवार यांच्या नावाने ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्याची मागणी
पिंपरी- रावेत येथे प्रस्तावित कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असून या जागेवर दिवंगत अजित पवार यांच्या नावाने भव्य ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी निगडी प्राधिकरण परिसरात आंदोलन करण्यात आले. मात्र नागरिकांचा विरोध कचरा व्यवस्थापनाला नसून, प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी जागांचा विचार करून पर्यावरणपूरक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी रावेत येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची सुमारे २५ एकर जागा नियोजित आहे. या जागेच्या सर्वे क्रमांक १७७, १५६ आणि १५८ चा समावेश असल्याचे वृत्त आहे. प्रकल्पामुळे संभाव्य प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेता शहरात हरित क्षेत्र वाढविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरात आणखी एक मोठे ऑक्सिजन पार्क उभारल्यास सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाला मदत होईल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
प्रस्तावित जागेच्या जवळ निवासी परिसर, शैक्षणिक संस्था आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची दुर्गा टेकडी असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाच्या जागेबाबत आक्षेप घेतला आहे. या ठिकाणी न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर मोठे सार्वजनिक उद्यान विकसित करून त्याला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
