पिंपरी- सख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षाच्या नराधमाला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या नराधमाने १० वर्षाच्या मुलीवर चारवेळा तर चार वर्षाच्या तिच्या बहिणीवर एकदा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे.
रमजान बन्नूसाब बागवान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सो आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे आईबाबा आणि आज्जी आजोबा आणि काका मजुरी करतात. या कुटुंबाच्या शेजारी आरोपी बागवान त्याची पत्नी आणि मुलगा राहतो. ते देखील मजुरी करतात.
चौथीत शिकणऱ्या मुलीला चाकूने पोट फाडेन अशी धमकी देऊन आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मे २०२६ ते जून २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी (दि.२७) रोजी नेहमीप्रमाणे १० वर्षीय पीडिता सकाळी आठ वाजता शाळेत गेली. अकरा वाजता ती घरी येईपर्यंत तिचे आई-वडील शेजारचे काका काकू कामावर गेले होते. आरोपी बागवान याची पत्नी आणि मुलगा देखील कामावर गेले होते. आरोपी बागवान घरीच थांबला होता.
थोड्यावेळाने १० वर्षीय पीडिता कपडे धुण्यासाठी गेली असताना नराधमाने ४ वर्षाच्या चिमुकलीचे तोंड दाबून आपल्या घरी नेले. शेजारच्या महिलेने हा प्रकार पहिला. तिने घरी आल्यानंतर पीडितेच्या आई वडिलांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित कुरुंबाने वाकड पोलीस ठाण्यात रमजान बागवानच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रमजान याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
