ब्रेकिंग न्यूज

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेला महामार्ग बंद राहणार 

Share

मुंबई – समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटण्याची घटना घडल्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या महामार्गांवर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या दरम्यान दोन टप्प्यात महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

२७ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर मध्यरात्री सुमारे दीड तासाच्या कालावधीत तीन कुटुंबांना धाक दाखवून लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लुटारूंच्या टोळक्याने धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करून लाखो रुपयांची लूट केल्याचे सांगण्यात आले आहे.

या तारखेला राहणार वाहतूक बंद

समृद्धी महामार्गावरील सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान ITMS अंतर्गत CCTV साठी गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात सिन्नर इंटरचेंज ते भाववीर इंटरचेंज या मार्गावर ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर रोजी वाहतूक बंद राहणार आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुपारी १२ ते १ या वेळेत, तर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी दुपारी ३ ते ४ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

दुसऱ्या टप्प्यात भाववीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान ४ सप्टेंबर, ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी वाहतूक बंदचे नियोजन आहे. या दिवशी मुंबई दिशेची वाहतूक दुपारी १२ ते १ आणि नागपूर दिशेची वाहतूक दुपारी ३ ते ४ या वेळेत बंद राहील.

या नियोजित वाहतूक बंदच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासी आणि वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, तसेच कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.