दुबईतून सायबर रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार मुंबई विमानतळावरून ताब्यात ; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

दुबईतून सायबर रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार मुंबई विमानतळावरून ताब्यात ; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
Share

पिंपरी- दुबईत बसून आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी हा चिनी सायबर गुन्हेगारांच्या मदतीने म्यूल अकाउंटच्या माध्यमातून कोट्यवधींची अफरातफर करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.

सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत त्याचे साथीदार तुषार अमरराम चौधरी (वय २९ रा. चिखली), आदर्श संतोष वाघमारे (वय २७ रा. आकुर्डी ) यांनाही यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे. सुमंत दसरे याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

तुषार अमराराम चौधरी आणि आदर्श संतोष वाघमारे हे दोघे विविध बँकांमध्ये खाती उघडून घेत असत. सायबर गुन्ह्यांमधून फसवणूक करून मिळालेली रक्कम रोख स्वरूपात तसेच चेकद्वारे काढून घेऊन त्यातील उर्वरित रक्कम दुबईत असलेल्या मुख्य आरोपी सुमंत दसरे याच्याकडे पाठवत असल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी सुमंत दसरे हा दुबईमध्ये चिनी सायबर गुन्हेगारांच्या मदतीने कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने तुषार चौधरी आणि आदर्श वाघमारे यांच्या माध्यमातून १५० हून अधिक बँक खाती मिळवली होती. या खात्यांचा वापर करून त्याने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुख्य आरोपी परदेशात असल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केले होते. त्यानंतर इंटरपोलच्या मदतीने दुबईतून त्याला डिपोर्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावर दाखल होताच पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच फसवणुकीची रक्कम कुठे वळविण्यात आली, याचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस करत आहेत.

Vedh News