पोखरी घाटात इको गाडी दरीत कोसळून चालकासह दोघांचा मृत्यू, चारजण जखमी

पोखरी घाटात इको गाडी दरीत कोसळून चालकासह दोघांचा मृत्यू, चारजण जखमी
Share

मंचर- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर-मंचर मार्गावरील पोखरी घाटात मारुती सुझुकी इको कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुधवारी (दि. २८) संध्याकाळी घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात घडला.

ज्ञानेश्वर गोविंद गवारे (वय ४१, रा. ढागेवाडी) आणि एक अज्ञात महिला अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात कांचन संदीप केंगले (वय ३५, रा. जांभोरी, नांदुरकीचीवाडी, ता. आंबेगाव), योगेश देवराम भांगे (वय २६, रा. तांबे, ता. जुन्नर), शिवाजी मारुती डामसे (वय ६०, रा. कोंढवळ, ता. आंबेगाव), सुभद्रा प्रमोद केंगले (वय ४०, रा. जांभोरी, ता. आंबेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर काही जखमींना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात, तर काहींना मंचर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

मारुती सुझुकी इको कार (MH १४/KW २०९१) घोडेगाव येथून भीमाशंकरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. पोखरी घाटातील तीव्र नागमोडी वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळून तिने अनेक पलट्या घेतल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला हातभार लावला.

Vedh News