नव्या केंद्रीय मोटार वाहन नियम १६७ च्या सुधारणेनुसार चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरणे किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह त्याला आव्हान देणे अनिवार्य आहे. या मुदतीत हरकत घेतली नाही, तर संबंधित चलन स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल.
नव्या तरतुदीनुसार पोलिस किंवा अधिकृत अधिकारी चलन प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करू शकतील. इलेकक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणांद्वारे चलन आपोआप तयार करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. प्रत्यक्ष चलन १५ दिवसांत, तर इलेक्ट्रॉनिक चलन तीन दिवसांत वाहनधारकापर्यंत पोहोचवावे लागणार आहे. सर्व चलन केंद्रीय पोर्टलवर नोंदवली जाणार आहेत. चलन चुकीचे असल्यास वाहनधारकांना ऑनलाइन पद्धतीने पुराव्यांसह हरकत नोंदवता येणार आहे.
केंद्रीय नियम सुधारणेनुसार, वाहनधारकाला चलनविरोधात नियुक्त प्राधिकरणाकडे ऑनलाइन हरकत नोंदवता येणार आहे. हरकत नोंदवताना संबंधित कागदपत्रे आणि पुरावे जोडणे आवश्यक आहे. हरकतीनंतर ३० दिवसात चलन निकाली निघणार आहे. यानंतर चलन रद्द होणार आहे. वाहनधारकाने नोंदविलेल्या हरकतीवर नियुक्त प्राधिकरणाकडून ३० दिवसांच्या आत निर्णय देणे अपेक्षित आहे.
यापूर्वी दंड भरण्यासाठी अथवा हरकत नोंदवण्यासाठी ९० दिवसांची मुदत होती. मात्र, अनेक प्रकरणांत चलन प्रलंबित राहत असल्याने वाहनधारक तसेच प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) अशा दोघांनाही अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्राने नियम अधिक कडक केले आहेत.
हरकत योग्य ठरल्यास चलन रद्द केले जाईल. मात्र, हरकत फेटाळल्यास वाहनधारकासमोर दंड भरणे किंवा न्यायालयात दाद मागणे हे दोन पर्याय उपलब्ध राहतील. नव्या नियमांनुसार चलन योग्य ठरल्यास संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक राहील. न्यायालयात जाण्याचा पर्याय निवडल्यास दंडाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम जमा करूनच याचिका दाखल करता येणार आहे. त्यासाठी वाहनचालकांना संदेश आणि ई-मेलच्या मदतीने रोज संदेश पाठवण्याची तरतूद नियमात आहे.
