मुंबई- भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असून मुंबई-अहमदाबाद मार्गांवर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन आपला पाहिला प्रवास कधी सुरु करणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद मार्ग २०२९ पर्यंत पूर्णपणे सुरू होण्याचा अंदाज असून पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२७ रोजी सुरत ते बिलिमोरा या ५० किमी अंतराच्या दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे नियोजन आहे. बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी ३२० किमी असेल त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा ५०८ किमीचा प्रवास अवघ्या २ तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर एकूण १२ स्थानके असणार आहेत.
या बुलेट ट्रेनचा तिकीट दर हा श्रीमंतांना नव्हे तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून निश्चित करण्यात येणार आहे. हा दर विमानाच्या तिकिटापेक्षा कमी ठेवण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. बुलेट ट्रेनच्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे एका तिकिटाचे भाडे अंदाजे ३ हजार रुपये एवढे असण्याची शक्यता आहे. या मार्गावरील सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
