ब्रेकिंग न्यूज

मोठी बातमी : राजधानी दिल्लीमध्ये हायकोर्टसह ६ ठिकाणी बॉम्बची धमकी, तपास यंत्रणा सतर्क 

Share

नवी दिल्ली- राजधानीतील दिल्ली हायकोर्टसह आणखी 5 महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची ई-मेलद्वारे धमकी आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक माहिती समोर आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने हायकोर्टाच्या अधिकृत मेलवर स्फोट घडवण्याची धमकी पाठवली. मेल मिळताच न्यायालय परिसर तात्काळ बंद करून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसराची इंच-इंच तपासणी सुरू आहे.

हायकोर्टाबरोबरच जामनगर हाऊस, झंडेवाला येथील बहुमजली इमारत, साकेतमधील जिल्हाधिकारी कार्यालय, आयजीआय विमानतळाचे टर्मिनल-3 आणि दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील एसडीएम कार्यालयालाही अशाच आशयाचे मेल आले आहेत. धमकी मिळताच या सर्व ठिकाणी अग्निशमन दल, डॉग स्क्वॉड आणि वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून सध्या सर्वत्र सखोल तपास सुरू आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

दरम्यान, धमकीचा मेल कोणी पाठवला, त्यात नेमके काय लिहिले होते आणि आतापर्यंत काय प्रगती झाली याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास गोपनीय ठेवण्यात आला आहे.

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, मेट्रो स्टेशन आणि गर्दीच्या भागात अतिरिक्त पोलीस तैनात आहेत. प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची बारकाईने तपासणी केली जात आहे. या धमकीमुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.