ब्रेकिंग न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये होणार

Share

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला अधिसभेने शुक्रवारी सशर्त मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये महाविद्यालये कुठे सुरु करणार, आजूबाजूला किती महाविद्यालये आहेत, याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

या सभेला प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. या बैठकीत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी नवीन महाविद्यालये व संस्थांच्या प्रस्तावांना सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयाच्या यादीनुसार काही मंत्री, राजकीय नेत्यांनी शिफारस केलेल्या महाविद्यालयांचा त्यामध्ये समावेश आहे.

शैक्षणिक वर्ष २०२७-२८ च्या वार्षिक सम्यक आराखड्या अंतर्गत ही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाची विद्या परिषद आणि अधिकार मंडळाच्या शिफारशींनुसार हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवले जाणार आहेत.