ब्रेकिंग न्यूज

अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…पुण्यात एका भोंदूबाबाचे कारनामे

Share

 पुणे- नाशिक येथील भोंदू अशोक खरात याचे महिलांसोबतचे अश्लील प्रकार उघड झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता एका नव्या भोंदूबाबाने पुण्यात आपले कारनामे दाखवले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचा अतिशय किळसवाणा चेहरा उघडकीस आला आहे. स्वतःकडे अलौकिक आणि दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी या भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील लांडे असे या भोंदू बाबाचे नाव असून तो पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहतो. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्नील लांडे हा स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणून मिरवून घेत असे आणि लोकांमध्ये स्वतःबद्दल एक प्रकारची भीती व आदर निर्माण करत असे. याच बनावाचा फायदा घेत त्याने एका लहान मुलीला आपल्या मांडीवर बसवलं आणि तिच्या कानात मंत्र फुकला. त्यानंतर मुलीला सांगितलं, ‘तुला काहीही अडचण अली तर माझ्याकडे ये…’, असे म्हणून तिची मानसिक फसवणूक करत अत्यंत असभ्य व गैरवर्तन केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीतं कौन्सिलिंग करण्यात आलं आहे. बिबवेवाडी येथील एका नागरिकाने तक्रार दिल्यानंतर स्वप्नील लांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी स्वप्नील लांडे याने अशाच पद्धतीने धर्माचा आणि चमत्कारांचा धाक दाखवून श्रद्धेच्या नावाखाली आणखी किती मुलींची फसवणूक केली आहे. त्याशिवाय कोणाची आर्थिक फसवणूक किंवा शारीरिक शोषण केले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अनेक लोक अडकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आणखी काही पीडित समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पालकांनी देखील आपल्या मुलीची सुरक्षितता धोक्यात येईल अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.