मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणाऱ्या सवलतींसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी) स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, लाखो पात्र प्रवाशांना अद्याप हे कार्ड मिळाले नसल्याने, गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
शासनाच्या सवलत योजना अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. परंतु, अर्ज करूनही अनेक प्रवाशांना प्रत्यक्ष कार्ड न मिळाल्याने आणि बसस्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या मुदतवाढीमुळे राज्यभरातील ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, उर्वरित पात्र प्रवाशांना आपले कार्ड मिळवण्यासाठी आता १ सप्टेंबरपर्यंतचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
”शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकाला विनासायास मिळावा हेच आमचे उद्दिष्ट आहे. तांत्रिक किंवा प्रशासकीय विलंबामुळे एकाही ज्येष्ठ नागरिक किंवा महिलेला प्रवासाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, म्हणूनच आम्ही या निर्णयाला १ महिन्याची मुदतवाढ दिली आहे.” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
एसटी प्रवासातील NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय
