पुण्यात अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य ; खासगी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा

पुणे- एका खासगी शिकवणी चालकाने बारा वर्षीय मुलाशी अश्लील कृत्य करून त्याला मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी संबंधित क्लास चालकाच्या विरोधात पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दत्ता लांडगे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता लांडगे हा घोरपडे पेठेतील आपल्या घरी खासगी शिकवणी वर्ग चालवितो. पीडित १२ वर्षीय मुलगा त्याच्याकडे नियमितपणे शिकवणीसाठी जात असे. आरोपीने मुलाला शिकवणीच्या बहाण्याने स्वतःच्या बेडरूममध्ये नेले आणि पुस्तक वाचण्यास सांगून त्याच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.
मुलाने या कृत्याला विरोध केला असता आरोपीने त्याला मारहाण केली आणि शिकवणी वर्गातून हाकलून दिले. जुलै महिन्यापासून आरोपी मुलाशी सातत्याने अश्लील कृत्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मुलाने धाडस करून घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दत्ता लांडगे याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अश्लील कृत्य करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. जाधव करत आहेत.






