पुण्यात ‘त्या’ व्यक्तीवर झालेला जीवघेणा हल्ला जमिनीच्या वादातूनच ! ५० हजारांत दिली होती खुनाची सुपारी

पुणे- दोन दिवसांपूर्वी २२ सप्टेंबरला दुपारी ससून रुग्णालय परिसरात एका व्यक्तीवर धारदार कटरने वार केल्याची घटना घडली होती. हा हल्ला जमिनीच्या वादातून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित व्यक्तीच्या खुनासाठी तब्बल ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जीवन रंगराव सूर्यवंशी ( ५५, रा. धाराशिव) असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात आनंद बाबा गव्हाणे (वय १९ रा. गुलटेकडी, पुणे) याला अटक केली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले आहे.
जीवन सूर्यवंशी हे २२ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या वकिलांसोबत सहकार आयुक्त कार्यालय येथे सुनावणीसाठी आले होते. सुनावणी संपल्यानंतर ते ससून रुग्णालयाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना गाठले. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी धारदार कटरने त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील प्रकाश आव्हाड आणि सारस साळवी यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला. हल्लेखोर एमएच १२ व्हीवाय ७६४३ क्रमांकाच्या दुचाकीवरून फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला आणि एका १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाला दांडेकर पुलाजवळ ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या दोघांकडे सखोल चौकशी केली असता, प्रवीण बाळाजी सूर्यवंशी (रा. बाभूळगाव, ता. उमरगा) याचा फिर्यादी जीवन सूर्यवंशी यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. याच वादातून प्रवीण याने दोघांना साधू वासवानी चौकातील निर्माण बार येथे भेटून फिर्यादीचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. दोघेही प्रवीणच्या गावाकडील असल्याने त्यांची ओळख आहे. यातील गव्हाणे हा फुड डिलिव्हरीचे काम करतो. तर मुख्य आरोपी प्रवीण यानेच हल्ल्यासाठी कटर पुरवल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी राहुल पवार, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, निलेश पालवे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे, महेश जाधव, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि अनिकेत माने यांनी केली.






