दोघां चुलत भावांचा चुलत बहिणीवर अत्याचार ; भोर तालुक्यातील संतापजनक घटना

दोघां चुलत भावांचा चुलत बहिणीवर अत्याचार ; भोर तालुक्यातील संतापजनक घटना
Share

भोर- भोर तालुक्यातून बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका गावात दोन अल्पवयीन चुलत भावांनीच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीची प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर दोन्ही भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भोर तालुक्यात पुन्हा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या दोन चुलत भावांनी जानेवारी २०२६ मध्ये पीडित अल्पवयीन मुलीवर बळजबरीने दोन ते तीन वेळा जवळच असलेल्या माळरानावर नेऊन अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर घाबरलेल्या पीडितेने घटनेची माहिती कुणालाच सांगितली नाही.

मात्र, या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा सर्व प्रकार समोर आला. पोटात दुखू लागल्याने जेव्हा पीडित मुलगी उपचारासाठी पुण्यातील ससून सामान्य रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तिच्या प्रसूतीची प्रक्रिया पार पडली.

ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या अल्पवयीन प्रसूतीबाबत संशय आल्याने त्यांनी तात्काळ भोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीने ससून रुग्णालयात धाव घेतली आणि पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला.

पीडितेच्या फिर्यादीवरून दोन्ही नराधम चुलत भावांविरोधात भोर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Vedh News