व्यायामाच्या नावाने महिलेला ‘बॅड टच’, बारामतीत प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

व्यायामाच्या नावाने महिलेला ‘बॅड टच’, बारामतीत प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
Share

बारामती- पोटदुखीच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका महिलेसोबत डॉक्टरने चुकीचा स्पर्श केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने बारामतीतील नामांकित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला १९ ऑक्टोबर रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेली होती. सलाईन लावल्यानंतर ते संपल्यावर डॉक्टरांनी तिला केबिनमध्ये बोलावले. त्यावेळी महिलेचा लहान मुलगा तिच्यासोबत होता. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर तिला पाठीच्या व्यायामाच्या हालचाली करण्यास सांगितले. यावेळी डॉक्टर वारंवार आपल्याजवळ येत होते. आपण त्यांना अंतर ठेवण्यास सांगितल्यानंतरही डॉक्टर पुन्हा जवळ आले. हात मागे ताणण्याची हालचाल करत असताना डॉक्टरांनी कमरेला हात लावून ‘छातीत धडधड होत आहे का?’ अशी विचारणा केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झाल्याने आपण पुढील व्यायाम करणार नसल्याचे सांगून औषधे देण्याची विनंती केली आणि त्यानंतर घरी आल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

घरी आल्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचं महिलेनं म्हटलं आहे. दसऱ्याच्या दिवशी संबंधित डॉक्टरांनी व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवल्या. त्यावर तिने मेसेज करून त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत. त्यावर डॉक्टरांनी माफी मागून ‘पुन्हा असं होणार नाही’, असा संदेश पाठवल्याचा दावा महिलेने केला आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेला पती बारामतीला आल्यानंतर तिने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २४) रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Vedh News