मुंबई – घाटकोपर पूर्व भागातील अशोकनगर परिसरातील गौसिया चाळीवर मोठी दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज पहाटे ३ ते ४ च्या सुमारास घडली.
लोक गाढ झोपेत असतानाच डोंगराचा मोठा कडा थेट गौसिया चाळीतील २ ते ३ घरांवर कोसळला. काही कळण्याच्या आतच डोंगराच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले.
या घटनेत आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही ५ ते ६ नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि पालिकेचे पथक तात्काळ दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
अंधाराचे साम्राज्य आणि कोसळणारा पाऊस यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे आले. मात्र, सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखालून एकेका जीवाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
