पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या कामात अडथळा आणून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती श्रीनिवास ढमाले असे या महिलेचे नाव आहे. ही घटना १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवड येथील चापेकर चौकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी वाहतूक विभागाच्या महिला पोलीस नाईक दीपाली नवल पाटील आणि त्यांचे सहकारी चापेकर चौकात वाहनांची तपासणी करत असताना टोयोटा इनोव्हा MH 14 EC 1900) गाडीच्या काचांना काळी फिल्म असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणीची मागणी केली असता, गाडीतील महिलेने कारवाईस नकार देत पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर कोणालातरी फोन करून बोलावून घेतले.
काही वेळानंतर तिथे आलेल्या ज्योती श्रीनिवास ढमाले यांनी स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून पोलिसांचा विरोध डावलून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गाडी अडवण्यासाठी पुढील चाकाला जॅमर लावले असता, त्यांनी जॅमर लावलेल्या स्थितीतच गाडी मागे खेचल्याने जॅमरचे नुकसान झाले. तसेच जोरात हॉर्न वाजवून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करत गोंधळ घातला.
याप्रकरणी पोलीस नाईक दीपाली पाटील यांच्या तक्रारीवरून ज्योती ढमाले यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सागर आधारी करत आहेत.
