ब्रेकिंग न्यूज

हडपसरमधील लॉजमध्ये वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, वकील तरुणांस अटक 

Share

पुणे – पुण्यातील हडपसर परिसरातील ‘वॉव स्टे लॉज’ मध्ये वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हडपसर पोलिसांनी एका २३ वर्षीय वकिलाला अटक केली आहे.

साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) या वकील तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि विश्वास हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते, मात्र त्यांच्यात वारंवार वाद होत असत. २४ सप्टेंबर रोजी दोघेही हडपसर येथील वॉव लॉजमध्ये आले होते. तिथे दोघांमध्ये पुन्हा कोणत्यातरी कारणावरून जोरदार वादावादी झाली, त्यानंतर विश्वास रागाने लॉजमधून अचानक निघून गेला.

विश्वासच्या याच त्रासाला कंटाळून साक्षीने लॉजमधील खोलीच्या सिलिंग फॅनला गळफास लावून आपले जीवन संपवले. साक्षीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपी विश्वास जगताप याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.